CONVOCATION ceremony
रावसाहेब थोरात सभागृहात द्वितीय पदवीदान समारंभ संपन्न
भारतीय संस्कृती प्राचीनतम असून आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा होती,यामध्ये गुरूने शिष्याचा सन्मान करायचा , गुरूच्या सांगण्याप्रमाणे शिष्याने श्रम करायचे, त्या श्रमाचे मुल्यमापन म्हणजे पदवीदान. आजही ती परंपरा कुलगुरूंच्या माध्यमातून सुरु असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एम जी चांदेकर यांनी केले ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठा विद्या प्रसारक समाज आयोजित द्वितीय पदविग्रहण समारंभ प्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते . अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार होत्या . व्यासपीठावर संचालक मुरलीधर पाटील , भाऊसाहेब खातळे व सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते . आपण स्वतःला जिंकण्यासाठी स्पर्धा करावी , दुसऱ्याला हरविण्यासाठी नाही, स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज असुन त्यासाठी चिंतन आणि आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहीजे, तुमच्या यशामध्ये तुमची मेहनत , प्रयत्न आणि गुरूंचा सहभाग असुन हा पदवीदान समारंभ तुमच्या प्रवासाचा शेवट नसुन प्रारंभ असल्याचे सांगुन मविप्र संस्थेला मोठा सामाजिक वारसा लाभलेला असल्याचे डॉ चांदेकर यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर माऊलींना प्रतिकुल परीस्थिती लाभली होती, त्यांना संन्यासाची मुले म्हणुन हिणवले जात होते, पण त्यातही ज्ञानदेवांनी आपले मोठे बंधु निवृत्तीनाथांना गुरु केले, त्यांच्या सांगण्यानुसार गीतेचे बोलीभाषेत रुपांतर करून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला, त्यांनी अध्यात्मिक समता आणली, जगासाठी पसायदान मागितले असे सांगुन चांगली गुणवत्ता प्राप्त करा , तुम्हाला आयुष्यभरासाठी धेय्य शोधता आले पाहीजे असे संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले . यावेळी स्वागत ,प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परीचय प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी केला. यावेळी विद्यापीठामध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त मविप्र संस्थेच्या १७ महाविद्यालयांच्या स्नातकांना डॉ एम जी चांदेकर यांचे हस्ते पदवीग्रहण करण्यात आले . यावेळी मिरवणुकीने प्रारंभ झाला , त्याचे संचलन परीक्षा विभागप्रमुख डॉ एम पी शिंदे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा सुरेश जाधव तर आभार दिंडोरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एन भवरे यांनी मानले. राष्ट्रीय छात्र सेना आणि नौदल च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.