कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर
Category : Latest News , social_projects , Uncategorised
समाजात जीवन जगत असताना त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपल्याकडे जे आहे त्यातून समाजासाठी आपण काही दान केले पाहिजे असे आपली संस्कृती आपणास सांगत आली आहे. यामध्ये आपण अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान व अवयवदान या सर्व दानामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे प्रतिपादन मविप्र उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी केले. पिंपळगाव बसवंत येथील मविप्र समाज संस्थेच्या कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये ते बोलत होते. याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा.रवींद्र मोरे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानोबा ढगे, मविप्र क्रीडाधिकारी प्रा.हेमंत पाटील, प्रा. सागर कडलग, प्रा. महेंद्र गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संपत खैरनार, डॉ.निवृत्ती राठोड, डॉ.शोभा डहाळे, मविप्र वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी रक्त संक्रमण अधिकारी डॉ.उज्ज्वल पाटील, डॉ. ज्योती फडोळ, मनीषा सराफ, सीमा माळोदे, कल्याणी होळकर आणि त्यांच्या टीममधील सर्व सहकारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला महाविद्यालयाचा खेळाडू कु. सागर दत्तात्रय नागरे याचा संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपाध्यक्ष श्री. विश्वासराव मोरे पुढे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला जीवनदान देण्याच्या दृष्टीने रक्ताची नितांत गरज जेव्हा भासते तेव्हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने रक्तदान केलेली व्यक्ती ही त्याच्या जीवनातील श्रेष्ठ व्यक्ती म्हणून तो तिच्याकडे पाहतो त्यामुळे रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे असते असे विचार त्यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नौकानयन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू धनेश भडांगे याने रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली.याप्रसंगी विद्यार्थी, खेळाडू, प्राध्यापक व सेवक यांच्या वतीने एकूण ३८ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.