मविप्र रुग्णालयाला आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण
Category : Latest News , social_projects , Uncategorised
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व मविप्र रुग्णालयाला आयडीबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज दि.२४ ऑगस्ट रोजी करण्यात आले.मविप्र रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या प्रांगणात सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, आयडीबीआय बँकेचे मुंबई झोनचे मुख्य महाव्यवस्थापक शशांक दीक्षित यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास मविप्रचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी.मोगल, संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, आयडीबीआय बँक नाशिकचे विभागीय प्रमुख हर्षद बर्जे, बँकेच्या एम.जी. रोड शाखेचे प्रमुख सुमित नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मविप्र शिक्षण संस्था ही केजी पासून पीजी पर्यंत शिक्षण देणारी मोठी संस्था असून मविप्र रुग्णालयाची आरोग्य सेवा आणि सुविधा मोठी आहे, मविप्र रुग्णालयाच्या या समाजपयोगी आरोग्य सेवेत आयडीबीआय बँकेच्या वतीने रुग्णवाहिका देऊन आमचाही या मोठ्या कार्यात छोटासा सहभाग असल्याचे प्रतिपादन यावेळी बँकेचे मुंबई झोनचे मुख्य महाव्यवस्थापक शशांक दीक्षित यांनी व्यक्त केले.
सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनीही बँकेने मविप्र रुग्णालयाला दिलेल्या रुग्णवाहिकेच्या मदतीबद्दल आभार व्यक्त करत मविप्र रुग्णालय हे नाशिक शहर आणि जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांना आशेचा किरण असून मविप्र रुग्णालयात सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा, दर्जेदार व माफक दरातील आरोग्य सेवा देण्यासाठी मविप्र संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.यावेळी मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी बँकेचे रोहित मोहेकर, पराग खराटे, योगेश सोनवणे, व्यवस्थापक सागर गायकवाड, रुग्णालयाच्या उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना देवणे, महाविद्यालयाचे वित्त अधिकारी सुजय ढेरंगे, ट्रान्सपोर्ट विभागाचे किशोर गायकवाड, सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वाहनचालक व विद्यार्थी व रुग्ण नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे योगेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार आयडीबीआय बँकेचे शाखाप्रमुख सुमित नवाळे यांनी मानले.