मा. सरचिटणीस, म.वि.प्र. समाज, नाशिक यांचे मनोगत
Category : Uncategorised
मविप्र समाजाच्या सर्व सन्माननीय सभासद बंधू -भगिनींनो, सप्रेम नमस्कार !
मविप्र मध्ये परिवर्तनाचा, बदलाचा आपण कौल दिलात त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. ज्या विश्वासाने तुम्ही समाजाच्या पुनरुत्थानाची जबाबदारी आम्हा सर्वांवर सोपविलीत त्याबद्दल मी आपले पुन:श्च आभार मानतो. संस्थेची सूत्रे हाती घेतली तेव्हा संस्थेची परिस्थिती चिंताजनक होती. शेकडो कोटी रुपयांचे कर्ज संस्थेवर होते. कारभारात ताळमेळ नव्हता. सर्वच स्तरावर दर्जा घसरलेला होता. काम अवघड होते, परंतु तुमचा विश्वास, सेवक-शिक्षकांची साथ आणि प्रत्येकाने स्वतःला झोकून देऊन केलेले ध्येयवादी कार्य यामुळे गेल्या वर्षभरात संस्थेमध्ये झालेले गुणात्मक बदल आपल्यासमोर आहेत. या काळात संस्थेमध्ये घेतला गेलेला प्रत्येक निर्णय बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीला स्मरूनच घेतला गेला हे मी ठामपणे सांगू इच्छितो. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव आहे. कर्तव्यांचे भानही आहे आणि रोज स्फूर्ती मिळण्यासाठी तुमचे पाठबळही आहे. पुन:श्च मनपूर्वक आभार ! जय मविप्र ! जय महाराष्ट्र ! 

-आपला विश्वासू,
ॲड. नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.