विकासाच्या व विस्थापनाच्या अभ्यासातून वास्तवाची जाणीव करून देणे आणि धोरणांना आकार देणे गरजेचे – राकेश दिवाण
Category : Uncategorised
विकास आणि विस्थापनाचा पुनर्विचार राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप
मविप्र. समाजाचे के. टी. एच. एम. कॉलेजचा समाजशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ व २५ जानेवारी २०१९ रोजी आयोजित “विकास आणि विस्थापनाचा पुनर्विचार” या राष्ट्रीय चर्चा सत्राची यशस्वी सांगता झाली. या प्रसंगी मध्यप्रदेशचे पत्रकार, संशोधक राकेश दिवाण यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात. ‘ विकास ही उन्नत, समाधानी आनंदी जीवनाची स्थिती आहे. मूळ गरजांची पूर्ती होणे ही पहिली पायरी असते. त्या गरजा पूर्ण होण्यातून विकासाची प्रक्रिया सुरु होते. पण शहर केंद्रित विकासामुळे वंचित, आदिवासींचे, शेतकर्यांचे झालेले विस्थापन त्यांचे शाश्वत जगणेच धोक्यात आणत आहे. विकास प्रकल्पांचे दावे केले जातात. पण हे दावे प्रत्यक्षात येतात का हे पहिले जात नाही. उदा. नर्मदा प्रकल्पाचे पूर नियंत्रण, वीज निर्मिती, आणि शेती व पिण्याच्या पाण्याची उपलब्धी याबाबतचे दावे खरे झाले नाही. विकासाच्या व विस्थापनाच्या अभ्यासातून या वास्तवाची जाणीव करून देणे आणि धोरणांना आकार देणे शक्य होईल असे ते म्हणाले.
या राष्ट्रीय चर्चासत्रात नंदिनी सुंदर (दिल्ली विद्यापीठ), डॉ. श्रुती तांबे ( पुणे विद्यापीठ) मेघनाथ भट्टाचार्य ( रांची झारखंड), डॉ. रमेश मांगलेकर ( बंगरुळू) आदींनी आपले अभ्यास व विचार व्यक्त केले.संशोधक व प्राध्यापक यांनी आपले लेख सादर केले.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी मविप्र. सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. संजय सावळे, प्रा. डी. एच. शिंदे , प्रा. उमेश शिंदे , प्रा. शशिकांत माळोदे , डॉ. योगेश गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले. उपप्राचार्य डॉ. बी. डी. पाटील, डॉ. बी. जे. भंडारे, डॉ. आर. डी. दरेकर , प्रा. तुषार पाटील, प्रा. टिळे . प्रा. पगार आदी उपस्थित होते.