विज्ञानाची कास सोडली तरच भारताचा विकास होईल – जेष्ठ पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी …
Category : Uncategorised
डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेत थोरात सभागृहात विचारमंथन …
तंत्रज्ञान व माणसाच्या उपभोगामध्ये होणारी वाढ यामुळे आपण उत्पादनात वाढ करतो आहोत,मात्र त्यासोबत नैसर्गिक संसाधनेही संपवीत आहोत. जैवविविधतेलाहि मोठ्या प्रमाणात धोका पोहचवत आहोत.यंत्रांमुळे मानवाचा विकास खुंटला असून याला विज्ञानच जबाबदार आहे.मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड,जमिनीत रासायनिक खतांचा वापर यामुळे ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. अधिक उत्पादन मिळविण्याच्या मोहात तसेच राष्ट्रीय उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेत आपले शारीरिक,मानसिक स्वास्थ बिघडवत आहोत.त्यामुळे विज्ञानाची कास सोडली तरच भारताचा विकास होईल असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी केले ते के टी एच एम महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग आयोजित दहाव्या डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते होते. व्यासपीठावर संचालक नाना महाले, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ.एन. एस. पाटील, प्रा. एस. के. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. मत्सागर, डॉ. जे. एस. आहेर, डॉ.श्रीमती बी. डी. पाटील,प्रा. डी. आर. पताडे,डॉ. बी. जे. भंडारे उपस्थित होते.
व्यक्तीचे उपभोग वाढल्यामुळे कुटुंबाची हानी होत आहे.आपल्याला विज्ञानाला नाकारायचे नाही मात्र विज्ञानाच्या माध्यमातून माणसांच्या जाणिवांचा ,मनाचा,अध्यात्माचा विकास व्हावा हि अपेक्षा असून मानवानेही उपभोग व मर्यादांना आळा घातला तर आपल्याला खराखुरा विकास साधता येईल असे सांगून कुलकर्णी यांनी आपण विज्ञाननिष्ठ होऊ नका अशी देखील विनंती उपस्थित श्रोत्यांना केली मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनाचा योग्य पद्धतीने वापर करणे मानवाच्या हिताचे ठरेल असेही त्यांनी अखेरीस सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात सभापती माणिकराव बोरस्ते यांनी ‘पुरुष व स्रीयांच्या तुलनेत स्रिया ह्या पर्यावरणाची काळजी अधिक प्रमाणात घेतात त्यामुळे पर्यावरण राखण्यास मोठे सहाय्य मिळते असे सांगून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यावरण राखण्याचा अवलंब आपल्या जीवनात करावा असे सांगितले.
उद्घाटक नाना महाले यांनी आपल्या मनोगतात ‘विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी,त्यांनी ज्ञान आत्मसात करून स्वतःचा विकास करावा,त्याबरोबरच एक चांगले नागरिक बनून आजूबाजूच्या समाजासही सहाय्य करावे तसेच पर्यावरण या विषयावर देखील संशोधन करावे असे सांगितले.
प्रास्ताविक समन्वयक प्रा.प्राची पिसोळकर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.श्रीमती संगिता पानगव्हाणे यांनी केले.सूत्रसंचलन कु.शरयू जाधव हिने तर आभार प्रा. योगेशकुमार होले यांनी मानले. यावेळी प्रा.गोकुळ सानप,प्रा.विशाखा ठाकरे उपस्थित होते.