बहुजन हिताय बहुजन सुखाय

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक.

Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik.

Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road, Nashik-422002, Maharashtra, India.

Author Archives: Editorial Team

  • -

मविप्रच्या फार्मसी महाविद्यालयाचे जीपॅट परीक्षेत यशाची परंपरा कायम …

Category : social_projects

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) दरवर्षी फार्मसी च्या विद्यार्थ्यांकरिता जी पॅट (Graduate Pharmacy Aptitude Test) ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा घेण्यात येते,शैक्षणिक वर्ष २०१९ च्या जी-पॅट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन मविप्रच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत ४० विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.यापैकी सौरभ भोरकडे व साक्षी पगार यांनी ऑल इंडीया रँकमध्ये बारावा क्रमांक पटकाविला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऑल इंडिया रँक १०० च्या आत महाविद्यालयाचे ०९ विद्यार्थी आहेत. सदर परीक्षेसाठी देशातून ३५ हजार विद्यार्थी बसलेले होते.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेतांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद,नवी दिल्ली यांच्याकडून दरमहा १४,४०० रु. शिष्यवृत्ती देण्यात येते.

मविप्र फार्मसी महाविद्यालय हे पुणे विद्यापीठातील सर्वात जुने व सरकारी अनुदान मिळत असलेले एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आज मोठ्या संख्येने नायपर (चंडीगड ),आयसीटी (मुंबई ),बिट्स (पिलानी),यासारख्या ठिकाणी पुढील शिक्षण घेत आहेत तसेच अनेक विद्यार्थी औषधनिर्माण क्षेत्रातील औद्योगिक,शैक्षणिक व संशोधन विभागात देशात व परदेशात शिक्षण घेत आहेत.

सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे , सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार , सभापती माणिकराव बोरस्ते , चिटणीस डॉ सुनिल ढिकले , उपसभापती राघोनाना अहिरे ,सर्व संचालक , शिक्षणाधिकारी डॉ एन एस पाटील ,प्राचार्य डॉ डी व्ही डेर्ले,प्रा.अशोक पिंगळे,एम फार्म कोर्स समन्वयक व उपप्राचार्य  डॉ.मिलिंद वाघ व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन केले आहे.


  • -

मविप्र कृषी महाविद्यालयाकडून माती परीक्षण जनजागृती मोहीम …

Category : social_projects

 मविप्रच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने नाशिक जिल्हा मानव विकास कार्यक्रमांतर्गत फिरती माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेच्या माध्यमातून चांदोरी ता.निफाड येथे माती व पाणी परीक्षण जनजागृती अभियान राबविण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक प्रल्हाद दादा गडाख होते. त्यांनी माती परीक्षणाचे महत्व सांगतांना माती परीक्षण हि काळाची गरज असून प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करूनच खतांच्या मात्रा पिकास देण्याचे आवाहन केले.

या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.बी.चव्हाण यांनी प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करावे असे सांगून सेंदीय शेतीचे महत्व विषद केले. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त शेतीकडे वाटचाल करावी असे सांगितले. विभागाच्या प्रमुख श्रीमती डॉ.ए.ए.बोडके यांनी माती व पाणी परिक्षणाबद्दल माहिती दिली.प्रा.श्रीमती एम.एस.मगर यांनी आभार मानले.उपक्रमासाठी प्रयोगशाळा सहाय्यक के.पी.पवार तसेच चांदोरी गावचे उपसरपंच शिरीष गडाख,पोलीस पाटील अनिल गडाख,योगगुरू मधुकर आवारे, मधुकर टर्ले,विजय बागस्कर,शिवाजी गडाख, चंदूशेठ गायखे,विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार व शिक्षणाधिकारी डॉ.एन.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


  • -

अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा – डॉ.अनिता पिल्लई …

Category : social_projects

रावसाहेब थोरात सभागुहात आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात 

आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दृश्य साक्षरतेचा (Visual Literacy) समावेश असावा, यामध्ये डीजीटल स्टोरी टेलींग मध्ये व्याकरणावर भर न देता कथेच्या माध्यमातून तो विषय विद्यार्थ्यांसमोर मांडला जातो. या अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा असे मत सिंगापूरच्या डॉ. अनिता पिल्लई यांनी व्यक्त केले त्या मविप्र समाजाच्या के टी एच एम महाविद्यालय मराठी,हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होत्या.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार होत्या. यावेळी मॉरीशसच्या श्रीमती मधुमती कौंजुल, लक्ष्मी झुम्मून, नेपाळ चे प्रा. लक्ष्मण ग्यानवळी, श्रीलंकेचे प्रा. उपुल रणजीत तसेच डॉ. मृगेंद्र पाटील (मुंबई), डॉ. संजय करंदीकर व डॉ. नवनीत चव्हाण (गुजरात), डॉ.करूणा उपाध्याय व डॉ. अभिजित देशपांडे (मुंबई), डॉ.संजीवकुमार जैन (भोपाळ), डॉ.पौर्णिमा कुलकर्णी, डॉ.प्रशांत मोघे,संस्थेचे शिक्षणाधिकारी  डॉ.डी.डी.काजळे,डॉ.आर.डी.दरेकर, सी.डी.शिंदे,प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे,डॉ.वेदश्री थिगळे, उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर, समन्वयक डॉ.पी.व्ही.कोटमे, डॉ. डी.पी.पवार,डॉ. वाय.आर.गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
        आजच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये साहित्य,संस्कृती,समाज व माध्यमांतर या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःला चांगले अभिव्यक्त करू शकतील या अभिव्यक्तीला डिजिटल तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर विद्यार्थ्यांचा प्रभावी कौशल्यविकास होऊ शकतो असेही पिल्लई यांनी यावेळी सांगितले.
   अध्यक्षीय मनोगतात सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांनी ‘ साहित्यामुळे आपला सामाजिक पिंड घडतो,वेगवेगळ्या काळातील साहित्यकृती या त्या-त्या वेळेच्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण झाल्या.विचार आंदोलने साहित्यातूनच प्रगट होतात.साहित्य हा समाजाचा आरसा असून व्यक्ती हा साहित्याच्या केंद्रस्थानी आहे.संत ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंत सर्वांनी समाजाला प्रेरित केले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात सत्य,अहिंसा आणि करुणेचा समावेश केला.ज्ञानेश्वरी व पसायदान समाजासाठी मांडले. साहित्यासाठी हा सुवर्णकाळ असल्याचे सांगून या दोनदिवशीय चर्चासत्रास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
  मॉरीशस च्या प्राध्यापिका श्रीमती मधुमती कौंजुल यांनी आपल्या बीजभाषणात ‘ १९७७ मध्ये सर्वप्रथम मराठी भाषा मॉरीशस विद्यापीठात शिकविण्यास सुरुवात झाली.आपली भाषा,संस्कृती आणि परंपरा टिकविण्यासाठी मॉरीशसमध्ये आपले भारतीय गुढीपाडवा,महाराष्ट्र दिन,गणेशचतुर्थी,दीपावली,मराठी भाषा दिन यासोबतच ईद-उल-फित्र,ख्रिसमस सणही उत्साहात साजरे होतात.या बरोबरच मराठी भाषा संवर्धनासाठी व वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
     श्रीलंका येथील हिंदी विभागप्रमुख डॉ विपुल रणजीत यांनी ‘ श्रीलंकेत हिंदी अभ्यासाला १८८० साली एल्फिन्स्टन नाटक कंपनीचे आगमन झाल्यामुळे सुरुवात झाल्याची नोंद आहे.रामायण आणि महाभारताने तेथील जनतेला प्रभावित केले आहे. १९३४ सालापासून श्रीलंकेतील शाळांमध्ये हिंदी विषय शिकविण्यास सुरुवात झाली. आज श्रीलंकेतील ६ विश्व विद्यालयांमध्ये ७ व्यक्ती हिंदी विषय शिकविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मराठी,हिंदी,इंग्रजी विषयातून आलेल्या २४० संशोधन पेपरच्या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.योगेश गांगुर्डे यांनी सुत्रसंचलन प्रा.तुषार पाटील यांनी तर आभार प्रा.राजेंद्र हिरे यांनी मानले.


  • -

के. टी. एच. एम. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

Category : Uncategorised

साहित्य, संस्कृती, समाज व माध्यमांतर या विषयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये दोन दिवस जे विचारमंथन झाले.त्यातून प्रत्येकाला येथून सामाजिक जाणीवेतून काहीतरी घेऊन जाता येईल. या ठिकाणी तीनही भाषांच्या माध्यमातून साहित्याचे विविध अंगांनी जो अभ्यास झाला, त्यातून समाज व समाजातून संस्कृतीचे दर्शन घडले. साहित्याचे समाज आणि संस्कृतीमध्ये मोठे महत्व असून साहित्याच्या माध्यमातूनच नटसम्राट, पु.ल. देशपांडे यांच्यावरील भाई यासारख्या चित्रपटांची निर्मिती झाली असे मविप्र संचालक सचिन पिंगळे यांनी सांगितले ते के टी एच एम महाविद्यालय मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी व्ही.एल.सी सभागृहात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मॉरीशसच्या श्रीमती मधुमती कौंजुल, लक्ष्मी झुम्मून, नेपाळ चे प्रा.लक्ष्मण ग्यानवळी, श्रीलंकेचे प्रा.उपुल रणजीत तसेच डॉ. मृगेंद्र पाटील (मुंबई), डॉ. संजय करंदीकर व डॉ. नवनीत चव्हाण (गुजरात), डॉ.करूणा उपाध्याय व डॉ.अभिजित देशपांडे (मुंबई), डॉ.संजीवकुमार जैन (भोपाळ), डॉ.पौर्णिमा कुलकर्णी, समन्वयक डॉ. पी. व्ही.कोटमे, डॉ. डी. पी. पवार, डॉ. वाय. आर. गांगुर्डे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी ‘ विज्ञान आणि सामाजिक शास्र विषयांच्या चर्चासत्रांचे आयोजन बऱ्याच ठिकाणी केले जाते मात्र भाषेचा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्याचे निश्चित केले,यामागील हेतू हाच होता कि ‘ विविध देशातील आपल्या असलेल्या संस्कृती,परंपरेचे दर्शन तसेच यासंदर्भातील माहिती विद्यार्थी व संशोधकांपर्यंत पोहोचविणे. आजच्या काळात ई-लर्निंग,पी लर्निंग आणि एम (मोबाईल ) लर्निंग चा अवलंब केला जात असतांनाही या परिषदेसाठी ठेवण्यात आलेल्या विविध विषयांमधून जे विचारमंथन झाले,तसेच संशोधकांनी जे अभ्यासपूर्ण पेपर सादर केले त्याचा निश्चितच उपयोग सगळ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परिषदेच्या यशस्विते व आयोजनासंदर्भात काही संशोधकांनी आपले विचार व्यक्त केले यात डॉ.सालेम अब्दुल कवीद (येमेन) यांनी सांगितले कि ‘ या परिषदेतून भारतीय संस्कृती आणि साहित्य याच्या आम्ही खूप जवळ आलो.मानवतेचे एक प्रतिक आम्हाला भारतात बघायला मिळाले.आम्ही एक परिवार म्हणून या ठिकाणी राहिलो.

या दोन दिवशीय चर्चासत्रामध्ये जी विषयांची निवड करण्यात आली होती,त्या विषयांवर सर्व संशोधकांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले.यामधून आपली संस्कृती हि केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही टिकून राहिलेली आहे असे डॉ.पोर्णिमा कुलकर्णी यांनी सांगितले.

डॉ.मधुमती कौंजून यांनी या चर्चासत्रातून आम्ही आपली संस्कृती,परंपरा आणि भाषा हि मॉरीशस या देशामध्ये मोठ्या प्रमाणात टिकविलेली आहे.आपल्या भाषेच्या संवार्धानासाठि आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे सांगितले ‘

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुत्रसंचलन प्रा. तुषार पाटील यांनी तर आभार डॉ.दिलीप पवार यांनी मानले.


  • -

सामाजिक सौरचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज – डॉ.श्रुती तांबे

Category : social_projects

के टी एच एम महाविद्यालयात समाजशास्र विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन

कोट्यावधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मुठ्भरांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, आयुष्याची गुणवत्ता,लिंगभाव विकास निर्देशांक,आनंद निर्देशांक यांचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे त्यामुळे सामाजिक सौरचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्र विभागप्रमुख डॉ.श्रुती तांबे यांनी सांगितले त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के टी एच एम महाविद्यालयाच्या समाजशास्र विभाग आयोजित  दोन दिवशीय ‘ Rethinking Development and Displacement in India ‘ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या, यावेळी व्यासपीठावर माजी बीसीयूडी व समाजशास्र विभागप्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे डॉ. आर. बी. पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, समाजशास्र विभागप्रमुख डॉ. संजय सावळे उपस्थित होते.

डॉ. तांबे पुढे म्हणाल्या कि ‘समाजशास्राने विकासाचा अभ्यास पुरेशा गांभीर्याने केला का ? असे विचारण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगून विशेषतः मध्यमवर्गीयांत सांस्कृतिक पातळीवरती भिन्नता याचेही विश्लेषण केले.

डॉ. आर. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात ‘ भारतामध्ये प्रामुख्याने खाणी,खाजगी उद्योग,अभयारण्ये,धरणे यामुळे विस्थापितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.याचा परिणाम आदिवासींवरती याचा परिणाम आदिवासींवर होतो.पुनर्वसानासंदर्भात कायदे असून त्याचा योग्य तो वापर होत नाही त्यामुळे पुनर्वसित नागरिकांना सुविधा मिळत नाही.याचे वारणा व कोयना धरण हे उत्तम उदाहरण आहे.

दिल्ली विद्यापीठ समाजशास्र विभागप्रमुख डॉ. नंदिनी सुंदर यांनी ‘नैसर्गिक आपत्तीमध्ये विस्थापित होणाऱ्यांमध्ये गरीब नागरिक मोठ्या प्रमाणावर असतात. विस्थापित झाल्यावर सामाजिक संरचना बदलते त्यामुळे असमानता निर्माण होते. नाते-संबंधामध्ये दरी निर्माण होते, लोकांमध्ये एकतेची भावना राहत नाही, याचा परिणाम समाज संरचनेवर होतो असे सांगितले.

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी ‘दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर समृद्धी महामार्ग या प्रश्नामुळे मोठ्या प्रमाणावरती लोक विस्थापित होणार आहेत. याला तुम्ही विकास म्हणू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून लोकांनी संघटीत होवून याला विरोध करणे अपेक्षित आहे असे मत त्यांनी मांडले. प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख  डॉ.संजय सावळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील यांनी तर आभार प्रा. डी. एच. शिंदे यांनी मानले. यावेळी प्रा. उमेश शिंदे, प्रा. शशिकांत माळोदे यांनी परिश्रम घेतले. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातून ९० लोकांनी नोंदणी केली आहे. उद्या शुक्रवार दि.२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्देशक मेघनाथ भट्टाचार्य तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांची व्याख्याने होतील.


  • -

विकासाच्या व विस्थापनाच्या अभ्यासातून वास्तवाची जाणीव करून देणे आणि धोरणांना आकार देणे गरजेचे – राकेश दिवाण

Category : Uncategorised

विकास आणि विस्थापनाचा पुनर्विचार राष्ट्रीय चर्चासत्राचा  समारोप

मविप्र. समाजाचे के. टी. एच. एम. कॉलेजचा समाजशास्त्र विभाग व  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ व २५ जानेवारी २०१९ रोजी आयोजित  “विकास आणि विस्थापनाचा पुनर्विचार” या  राष्ट्रीय चर्चा सत्राची यशस्वी सांगता झाली. या प्रसंगी मध्यप्रदेशचे पत्रकार, संशोधक राकेश दिवाण यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात. ‘ विकास ही उन्नत, समाधानी आनंदी जीवनाची स्थिती आहे. मूळ गरजांची पूर्ती होणे ही पहिली पायरी असते. त्या गरजा पूर्ण होण्यातून विकासाची प्रक्रिया सुरु होते. पण शहर केंद्रित विकासामुळे वंचित, आदिवासींचे, शेतकर्यांचे झालेले विस्थापन त्यांचे शाश्वत जगणेच धोक्यात आणत आहे. विकास प्रकल्पांचे दावे केले जातात. पण हे दावे प्रत्यक्षात येतात का हे पहिले जात नाही. उदा. नर्मदा प्रकल्पाचे पूर नियंत्रण, वीज निर्मिती, आणि शेती व पिण्याच्या पाण्याची उपलब्धी याबाबतचे दावे खरे झाले नाही. विकासाच्या व विस्थापनाच्या अभ्यासातून या वास्तवाची जाणीव करून देणे आणि धोरणांना आकार देणे शक्य होईल असे ते म्हणाले.

या राष्ट्रीय चर्चासत्रात  नंदिनी सुंदर (दिल्ली विद्यापीठ), डॉ. श्रुती तांबे ( पुणे विद्यापीठ) मेघनाथ भट्टाचार्य ( रांची  झारखंड), डॉ. रमेश मांगलेकर ( बंगरुळू) आदींनी आपले अभ्यास व  विचार व्यक्त केले.संशोधक व प्राध्यापक यांनी आपले लेख सादर केले.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी मविप्र. सरचिटणीस श्रीमती  निलीमाताई पवार व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. संजय सावळे, प्रा. डी. एच. शिंदे , प्रा. उमेश शिंदे , प्रा. शशिकांत माळोदे , डॉ. योगेश गांगुर्डे आदींनी  परिश्रम घेतले. उपप्राचार्य डॉ. बी. डी. पाटील,  डॉ. बी. जे. भंडारे, डॉ. आर.  डी.  दरेकर , प्रा. तुषार पाटील,  प्रा. टिळे . प्रा. पगार आदी उपस्थित होते.


  • -

नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणातील बदल विचारात घेऊन आधुनिक लॅण्डस्केपिंग करणे गरजेचे – आर्किटेकट अमृता पवार

Category : social_projects

के. टी. एच. एम. कॉलेज वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेसाठी मार्गदर्शक म्हणून जि. प. सदस्या आर्किटेकट अमृता पवार उपस्थित होत्या, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड होते. अमृता पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ‘ लॅण्डस्केपिंग हे वातावरणातील संतुलन राखण्यासाठी पूर्वीपासून जगभर केले जात असल्याचे सांगून मोठं-मोठ्या दगडांचे पिरॅमिड्स,चायनावॉल त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विहिरी,राजस्थानमधल्या बावडीजोहर पूजा पाठ करण्यासाठी नदीकाठचे घाट हे सर्व लॅण्डस्केपिंग चे प्रकार असून मोगलांच्या काळापासून आनंद मिळविण्यासाठी लॅण्डस्केपिंगची सुरुवात झाली.भारतात प्रामुख्याने समाजाला उपयोगी पडेल असे लॅण्डस्केपिंग केले जाते.भारतात आता शहरांमध्ये बऱ्याचशा इमारतींमध्ये भाजीपाला जीवनउपयोगी वनस्पतींची लागवड करून लॅण्डस्केपिंग सुरु केले आहे.

भारतात हल्ली अनेक खेड्यांमध्ये वाघ, बिबटे, शेतजमींनीमध्ये प्रवेश करतात, याचे कारण आपण त्यांच्या प्रदेशात अतिक्रमण केले आहे. चीनमध्ये सांडपाणी व कचरा यावर प्रक्रिया करून वातावरण पूरक असे लॅण्डस्केपिंग करण्यात आलेले आहे. लॅण्डस्केपिंग चा मोठ्या प्रमाणावर पर्यटनस्थळ म्हणून लोक कसा वापर करतात हे त्यांनी स्लाईड प्रेझेन्टेशन द्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.श्रीकांत जाधव यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.डी.जी.पोटे यांनी तर आभार विभागप्रमुख प्रा.डी.आर.पताडे यांनी मानले.

 


  • -

विज्ञानाची कास सोडली तरच भारताचा विकास होईल – जेष्ठ पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी …

Category : Uncategorised

डॉ.वसंतराव पवार व्याख्यानमालेत थोरात सभागृहात विचारमंथन …
      तंत्रज्ञान व माणसाच्या उपभोगामध्ये होणारी वाढ यामुळे आपण उत्पादनात वाढ करतो आहोत,मात्र त्यासोबत नैसर्गिक संसाधनेही संपवीत आहोत. जैवविविधतेलाहि मोठ्या प्रमाणात धोका पोहचवत आहोत.यंत्रांमुळे मानवाचा विकास खुंटला असून याला विज्ञानच जबाबदार आहे.मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड,जमिनीत रासायनिक खतांचा वापर यामुळे ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊन कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. अधिक उत्पादन मिळविण्याच्या मोहात तसेच राष्ट्रीय उत्पादन वाढविण्याच्या स्पर्धेत आपले शारीरिक,मानसिक स्वास्थ बिघडवत आहोत.त्यामुळे विज्ञानाची कास सोडली तरच भारताचा विकास होईल असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी केले ते के टी एच एम महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग आयोजित दहाव्या डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी  संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते होते. व्यासपीठावर संचालक नाना महाले, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, सेवक संचालक प्रा. नानासाहेब दाते, गुलाब भामरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ.एन. एस. पाटील, प्रा. एस. के. शिंदे, उपप्राचार्य डॉ. एम. बी. मत्सागर, डॉ. जे. एस. आहेर, डॉ.श्रीमती बी. डी. पाटील,प्रा. डी. आर. पताडे,डॉ. बी. जे. भंडारे उपस्थित होते.
      व्यक्तीचे उपभोग वाढल्यामुळे कुटुंबाची हानी होत आहे.आपल्याला विज्ञानाला नाकारायचे नाही मात्र विज्ञानाच्या माध्यमातून माणसांच्या जाणिवांचा ,मनाचा,अध्यात्माचा विकास व्हावा हि अपेक्षा असून मानवानेही उपभोग व मर्यादांना आळा घातला तर आपल्याला खराखुरा विकास साधता येईल असे सांगून कुलकर्णी यांनी आपण विज्ञाननिष्ठ होऊ नका अशी देखील विनंती उपस्थित श्रोत्यांना केली मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनाचा योग्य पद्धतीने वापर करणे मानवाच्या हिताचे ठरेल असेही त्यांनी अखेरीस सांगितले.
      अध्यक्षीय मनोगतात सभापती माणिकराव बोरस्ते यांनी ‘पुरुष व स्रीयांच्या तुलनेत स्रिया ह्या पर्यावरणाची काळजी अधिक प्रमाणात घेतात त्यामुळे पर्यावरण राखण्यास मोठे सहाय्य मिळते असे सांगून विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यावरण राखण्याचा अवलंब आपल्या जीवनात करावा असे सांगितले.
      उद्घाटक नाना महाले यांनी आपल्या मनोगतात ‘विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी,त्यांनी ज्ञान आत्मसात करून स्वतःचा विकास करावा,त्याबरोबरच एक चांगले नागरिक बनून आजूबाजूच्या समाजासही सहाय्य करावे तसेच पर्यावरण या विषयावर देखील संशोधन करावे असे सांगितले.
      प्रास्ताविक समन्वयक प्रा.प्राची पिसोळकर यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.श्रीमती संगिता पानगव्हाणे यांनी केले.सूत्रसंचलन कु.शरयू जाधव हिने तर आभार प्रा. योगेशकुमार होले यांनी मानले. यावेळी प्रा.गोकुळ सानप,प्रा.विशाखा ठाकरे उपस्थित होते.


  • -

मविप्र प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या अंतिम फेरी वकृत्व स्पर्धा संपन्न ….

Category : social_projects

प्राथमिक गटात गौरी खैरणार,माध्यमिक (इ.५ वी ते ७ वी ) गटात प्रज्वल सूर्यवंशी व  कुलदीप वाघ प्रथम  (इ.८ वी ते ९ वी) गटात  मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील वकृत्व स्पर्धा प्राथमिक फेरी शालेय पातळीवर,द्वितीय फेरी १५ केंद्रांवर व या स्पर्धेची अंतिम फेरी आज संस्थेच्या रावसाहेब थोरात संपन्न झाली,यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन संचालक सचिन पिंगळे उपस्थित होते.व्यासपीठावर शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे,परीक्षक प्रा.प्रकाश वामने,डॉ.श्रीमती उमा जाधव,डॉ.एस.आर.भालेराव. प्रा.मनिषा शुक्ल, मराठा हायस्कूल चे मुख्याध्यापक अरुण पवार उपस्थित होते.

यावेळी बोलतांना संचालक सचिन पिंगळे यांनी ‘ अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा या संकल्पनेतून मविप्र संस्था अनेक उपक्रम राबविते. प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वक्तृत्व स्पर्धांची सुरुवात हि विद्यार्थ्यांची वक्तृत्व कौशल्ये वाढावीत व तो सर्वांगाने परिपूर्ण व्हावा या उद्देशाने केलेली असून या स्पर्धेतून भविष्यात चांगले वक्ते निर्माण होतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शरदराव पवार,विलासराव देशमुख,बाळासाहेब ठाकरे,आर.आर.पाटील,एन.डी.पाटील यांसारखे मोठे नेते हे वक्तृत्वाच्या जोरावर राजकारणात यशस्वी ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे यांनी ‘ संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वक्तृत्व स्पर्धेतून चांगले व प्रभावी वक्ते तयार होतील असा विश्वास व्यक्त करतांना वक्तृत्व स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

इ. ३ री ते ४ थी साठी बलसागर भारत होवो,मित्र कसा असावा ?,गुरु देवोभव !,शाळाच नसत्या तर,आई मला खेळायला जाऊ दे ना हे विषय देण्यात आले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी साठी गाऊ त्यांना आरती,शिक्षण : यशस्वी जगण्याचा मूलमंत्र,अनंत अमुची धेय्यासक्ती,कर्मवीर रावसाहेब थोरात,स्री : काल.आज आणि उद्या तसेच इ.८ वी ते ९ वी साठी यशोगाथा मविप्र ची,ग्रंथ उजळीतो मार्ग आपुला,हरवत चाललंय गावच गावपण,जीवन त्यांना कळले हो! , साहित्यिक पु.ल.देशपांडे हे विषय ठेवण्यात आले होते. परीक्षक प्रा.प्रकाश वामने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वक्तृत्व सादर करतांना आवाजातील चढ-उतारावर लक्ष द्यावे असे सांगून विद्यार्थ्यांनी चांगले वक्ते होण्यासाठी पुस्तकांचे वाचन व मनन करावे असे सांगितले.

यावेळी द्वितीय फेरीत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाचे सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. इ. ३ री ते ४ थी साठी परीक्षक म्हणून सविता जाधव,.सुरेखा बोऱ्हाडे यांनी,माध्यमिक विभागाचे परीक्षक म्हणून  (५ वी ते ७ वी ) डॉ.एस.आर.भालेराव व प्रा.मनीषा शुक्ल  यांनी तर ८ वी व ९ वी गटासाठी  डॉ.श्रीमती उमा जाधव ,प्रकाश वामने यांनी यांनी काम बघितले. स्पर्धेचे नियम डॉ.डी.पी.पवार यांनी समजावून सांगितले.सुत्रसंचलन सुवर्णा गायकवाड यांनी केले.

निकाल :

प्राथमिक विभाग (री व ४ थी )

१) गौरी मधुकर खैरणार (अभिनव बालविकास मंदिर,उत्तमनगर,सिडको )

२) समृद्धी गोकुळ बोडके (बालशिक्षण मंदिर गोरेराम लेन,शाळा नं.२ )

3) अपेक्षा दिगंबर खैरणार (अभिनव बालविकास मंदिर,गंगापूर रोड,नाशिक )

उत्तेजनार्थ

१) श्रावणी धनंजय सोनवणे (आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल,सटाणा)

२) आदिती कांतीराम गिते (अभिनव बालविकास मंदिर,सायखेडा )

3) स्नेहल सुरेश पवार (आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल,सिन्नर )

 

माध्यमिक विभाग (इ.५ वी ते ७ वी )

१) प्रज्वल योगेश सूर्यवंशी (मराठा हायस्कूल, नाशिक )

२) सर्वेश प्रकाश कांगणे (जनता विद्यालय, मुखेड )

3)  प्रिया अरुण खैरनार (जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सटाणा )

उत्तेजनार्थ

१) समृद्धी विजय बनकर (मराठा हायस्कूल, नाशिक )

२)  खुशबू कृष्णा निकम (जनता विद्यालय, आघार )

3) आदित्य केशव गायकवाड (आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, दिंडोरी )

 

माध्यमिक – इयत्ता ८ वी व ९ वी 

१) कुलदीप धनराज वाघ (जनता विद्यालय, सातपूर )

२)  दुर्गा हिरामण बेंडकोळी (जनता विद्यालय, धोंडेगाव ) व

     राजश्री कल्याण पटेल (न्यू मराठा हायस्कूल, नाशिक )

3) हर्षाली सुनिल कापडणीस (जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सटाणा )

उत्तेजनार्थ

१) हरिष शिवाजी दांडेकर  (जनता विद्यालय, वडनेरभैरव )

२) प्रिया मारुती काळुंगे  (जनता विद्यालय, सोनांबे )

3) प्राची महेंद्र पाटील (जनता इंग्लिश स्कूल, जायखेडा )


  • -

विज्ञानाची बांधणी हि त्रिसुत्रावर आधारित – डॉ. आनंद करंदीकर

Category : social_projects

विज्ञान हे अनुभवांना प्रमाण मानते, जे अनुभवातून आपल्या मांडणीतून विसंगत दिसते ते वैज्ञानिकांनी मान्य करायला आहे.विज्ञानात अंतिम सत्य नाही तसेच विज्ञान हे तात्पुरते वैज्ञानिक सत्य असले तरी ते अंतिम सत्य नाही.विज्ञानाने अनपेक्षित व आश्चर्यकारक भाकीत केले पाहिजे,ते नाविन्यपूर्ण असावे ह्या त्रिसूत्रीवर विज्ञानाची बांधणी आधारित असल्याचे प्रतिपादन डॉ.आनंद करंदीकर यांनी केले. ते के टी एच एम महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग आयोजित दहाव्या डॉ वसंतराव पवार व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफतांना रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते. यावेळी संचालक सचिन पिंगळे,दत्तात्रय पाटील,शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे, डॉ.आर.डी.दरेकर, अॅड एकनाथ पगार, उपप्राचार्य डॉ.एम.बी.मत्सागर, डॉ.जे.एस.आहेर, डॉ. श्रीमती बी.डी. पाटील, प्रा. डी.आर.पताडे, समन्वयक प्रा.प्राची पिसोळकर उपस्थित होते.

विज्ञानाचा विकास आपल्या देशात हवा तसा होत नाही हे दुर्दैव आहे. देशात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थामध्ये कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांच्या हातून जागतिक स्तरावरील शोधाची निर्मिती न झाल्यामुळे आपल्या वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिकापासूनही वंचित राहावे लागले आहे मात्र आठव्या आणि नवव्या शतकात भारतामध्ये वास्तुशास्र, गुफाशिल्पे यांची जी निर्मिती झाली ती अप्रतिम असून त्या शिल्पकारांना विज्ञानाचेही ज्ञान होते असे म्हणता येईल. दिल्लीतील जंतर-मंतर दुर्बिण त्याचप्रमाणे भारताचा जगाच्या तुलनेत एकूण व्यापारात भारतीयांचा ५० टक्के वाटा होता. भारतीय खगोलशास्त्रज्ञानी ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करून तांत्रिक कौशल्य पुढे नेले.आपल्या देशातील संशोधक हे अमेरिकेत जाऊन संशोधनात सहभागी होतात, त्यामुळे अमेरिकेची तंत्रवैद्यानिक प्रगती हि जगाच्या तुलनेत अधिक आहे अशी देखील खंत डॉ. करंदीकर यांनी यावेळी व्यक्त केली.

  सूत्रसंचलन कु.प्रसाद देशमुख याने तर आभार प्रा. योगेशकुमार होले यांनी मानले.  प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती संगिता पानगव्हाणे यांनी करून दिला. यावेळी प्रा.गोकुळ सानप उपस्थित होते. उद्या दिनांक ३१ जानेवारी रोजी विज्ञान लेखिका श्रीमती माधुरी शानबाग या  ‘ विज्ञानाची खुणावणारी क्षितिजे ‘या विषयावर अखेरचे पुष्प गुंफतील.