Sanskrutik Mahotsav
म.वि.प्र. सांस्कृतिक अविष्कार कार्यक्रमात बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण…
मराठा विद्या प्रसारक, नाशिक संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कला, साहीत्य व संगीत क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने सांस्कृतिक महोत्सव, युवास्पंदन यासारखे उपक्रम गेल्या १० वर्षापासून हाती घेतले आहेत त्याचीच एक अलौकिक निर्मिती म्हणजे मविप्र सांस्कृतिक महोत्सव अविष्कार हा संगीतमय कार्यक्रम मंगळवार दि.३१ जानेवारी २०१७ रोजी कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र सभासदांच्या अवलोकनार्थ आयोजित केला होता.
सांस्कृतिक अविष्कारात शास्रीय गीतगायन, भारुड , गोंधळीगीत ,शास्रीय नृत्य, वैयक्तिक गीतगायन , लघुनाटिका ,मिमिक्री, वैयक्तिक वाद्यवादन इ. सांस्कृतिक अविष्कारांनी थोरात सभागृहाचे वातावरण मंत्रमुग्ध झाले होते . कार्यक्रमाची सुरुवात कु प्रांजल शेवाळे ह्या विद्यार्थिनीच्या ‘ ओमकार प्रधान रूप गणेशाचे’ या गणेशगीताने झाली, त्यानंतर मराठा हायस्कुल मधील ऐश्वर्या गुंजाळ व संघाने ‘ अगग विंचू चावला ‘ हे समाजप्रबोधनपर भारुड सादर केले. जनता विद्यालय वडाळीभोई शाळेतील शुभम गुजर या विद्यार्थ्याने कत्थक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी पर्यावरण रक्षणाचा सामाजिक संदेश देणारा कटपुतली डान्स होरायझन अकॅडेमी च्या विद्यार्थ्यांनी सादर केला.वैयक्तिक गीतगायन प्रकारात जनता विद्यालय लोहोणेर येथील जयेश महाजन या लहानग्याने सादर केलेल्या ‘ आकाशी झेप घे रे पाखरा ‘ या भावगीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते, यानंतर केंद्र सरकारच्या दिल्ली येथील कलाउत्सव कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या व जिल्हास्तरावर गोंधळगीत स्पर्धेत २७ संघांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या जनता विद्यालय सातपुर येथील चेतन लोखंडे व संघाने ‘ मुलगी वाचवा , मुलगी शिकवा ‘ असा सामाजिक संदेश देणारे गोंधळगीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली, तसेच वडांगळी हायस्कुल च्या ऋतुजा चव्हाणके व रोहिणी भुसे या विद्यार्थींनीची संबळ वादनातील जुगलबंदी हा मविप्र सांस्कृतिक अविष्कारातील विशेष बाब ठरली.समुहनृत्य प्रकारात सिन्नर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य , मोकभनगी शाळेतील विद्यार्थ्यांनी बोह्डानृत्य व जनता विद्यालय वडाळीभोई च्या विद्यार्थिनींनी दिंडीनृत्याने वातावरणात उत्साह संचारला होता, के टी एच एम महाविद्यालयातील नवनाथ राठोड याने तबलावादन व सुरज बोडाई याने मिमिक्री हे कलाप्रकार सादर करून विशेष दाद मिळविली. कार्यक्रमाचा शेवट शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याने करण्यात आला यावेळी ‘ हे हिंदू निसृह , ब्रम्ह शिवाजीराजा ‘ या शिवगानाने झाला.