आई-वडिलांच्या कष्टाला तिच्या जिद्दीने ‘समृद्धी’ देवळाली – भगूर परिसरात बारावीत समृद्धी पगारे प्रथम
महेश गायकवाड देवळाली कॅम्प : आई चार घरची धुणी-भांडी व घरकाम करते… तर वडील कंत्राटदाराकडे काम करतात…
अशा जेमतेम परिस्थितीतून बाहेर यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशी जिद्द उराशी बाळगून देवळाली कॅम्प
येथील मविप्र समाज संचलित एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील समृद्धी बाळू पगारे या विद्यार्थिनीने तब्बल
९०.८३ टक्के गुण मिळवून देवळाली- भगूर परिसरात पहिला क्रमांक मिळविला आहे.
मुलांच्या शिक्षणासाठी आईला लोकांकडे घरकाम करावे लागत असल्याने परिस्थितीची जाणीव ठेवून समृद्धीने शालेय
जीवनापासूनच अभ्यासात स्वतःला झोकून
दिले. दहावीच्या परिक्षेतही तिने ९० टक्के मिळविले आहेत. आई घर कामासाठी जात असल्याने अशावेळी घरातील कामे
सांभाळून समृद्धीने अभ्यास केला. कॉलेज आणि क्लास करून उरलेल्या वेळेपैकी दिवसरात्र तिने तब्बल सहा ते सात अभ्यास केला.
कुठलेही यश सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी मेहनत आणि कष्ट घ्यावेच लागतात. या वयात आपण अभ्यासाकडे लक्ष दिले तर
भविष्यात चिंता करण्याची गरज पडत नाही, त्यामुळे मुलांनी आत्ताच अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे,
असे समृद्धीने सांगितले. तिला आई-वडीलांबरोबरच प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, एस. एस. देशमुख, बी. एम. पाटील, निर्मला जाधव, पवार आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
समृद्धीला व्हायचंय सीए…
समृद्धीने मिळविलेले यश परिस्थितीचा बाऊ करणाऱ्यांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे. आता बारावीनंतर पुढे सीए होण्याचा
मानस समृद्धीने बोलून दाखविला. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याची तयारी असल्याचेही तिने सांगितले.