मविप्र माजी विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे इंग्रजी भाषेचे प्राविण्य वाढवण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा पायलट प्रकल्प सुरू करत आहे. ह्या क्षेत्रातील निष्णात EduTech कंपन्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येईल. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना ह्याने मोठी मदत होणार आहे. उदाजी वसतिगृहात राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने ग्रामीण भागातून येणाऱ्या मविप्रच्या विविध शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी अधिक आत्मसात करण्यासाठी “उदाजी इंग्रजी प्रभुत्व प्रकल्प” हाती घेण्यात येत आहे. ह्यात मविप्र माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य व उदाजीचे वसतिगृहाचे माजी विद्यार्थी उद्योजक गौतम नामदेवराव पाटील ह्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी उदारपणे या अभिनव उपक्रमासाठी सुरुवातीचा निधी दिलेला आहेच पण उदाजीच्या सर्व माजी विद्यार्थांच्या एकत्रित प्रयत्नाने हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. केवळ इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याने गुणी विद्यार्थी मागे पडू नयेत तसेच पुढची पिढी सर्व दृष्टीने सक्षम बनावी म्हणून ही मदत करत असल्याचे श्री. गौतम पाटील सांगतात. ह्याचा विशेष लाभ ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
ह्या प्रयोगात इंग्रजीमधील बोलीभाषेच्या कौशल्यासाठी डिझाइन केलेल्या अप्लिकेशनचा वापर करण्यात येईल. दैनंदिन जीवनातील कामांवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकता येणार आहे. भाषेतील चार मूलभूत स्तंभ; ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लेखन; यांचा या अभ्यासक्रमात समावेश असला तरी विशेष भर इंग्रजी बोलण्यावर दिला जाईल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, पाचशे विद्यार्थ्यांची व सेवकांची निवड केली जाईल. मविप्रच्या विविध शाळांतील शिक्षक या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रजी विभागाशी सहकार्य करतील. पुढे ह्याची व्याप्ती वाढवून दहा हजार विद्यार्थी व शिक्षकांना ह्यातून मदत मिळणार आहे. उदाजी वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या प्रकल्पात योगदान करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.