डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा
250 डॉक्टर्स, परिचारिका व विद्यार्थ्यांचा सहभाग
आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे बालरोग विभाग आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडीअट्रिक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सीपीआर दिन साजरा करण्यात आला.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व संचालक आणि शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्र्वर लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ.सुधीर भामरे उपस्थित होते. समाजातील प्रत्येक नागरिकाला उपयुक्त असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी बालरोग विभागाचे कौतुक केले. तसेच प्रशिक्षण देण्यात आल्यावर एक जीव जरी वाचवता आला तरी या कार्यक्रमाचे खरे यश असल्याचे डॉ.सुधीर भामरे यांनी शेवटी सांगितले.
बालरोग विभागाचे प्रमुख आणि पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, वैद्यकीय आणि त्या बरोबरच निमवैद्यकिय आणि सर्वसामान्य लोकांना पण बेसिक लाईफ सपोर्टचे प्रशिक्षण आणि सीपीआर देता येणे आवश्यक आहे, म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.
बाल अतिदक्षता विभाग तज्ञ डॉ.तरुण कानडे, डॉ.अभिजीत सांगळे, डॉ.सागर भालेराव, नवजात शिशूतज्ञ डॉ.राहुल कोप्पिकर, डॉ.निलिमा बद्रखे यांनी मोठ्या माणसांना, लहान मुलांना आणि एक वर्षाखालील मुलांना सीपीआर कसे द्यायचे ते विविध व्हिडिओद्वारे आणि प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले. लहान मुले आणि मोठ्यामधील सीपीआर यातील फरक मुद्देसूद समजावून सांगितला. इमर्जन्सी ही सांगून येत नाही, म्हणून अशावेळी हे प्रशिक्षण शिकण्याने प्रसंगावधान राखून एखाद्याचा जीव आपण वाचवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण सत्रासाठी महाविद्यालयातील विविध विभागांचे डॉक्टर्स, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्नशिप विदयार्थी, फिजिओथेरपी व परिचारिका शिक्षण संस्थेतील विदयार्थी असे एकूण २५० जणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या प्रसंगी माननीय अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक चेसचिव डॉ. सचिन पाटील, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अमृत कौर, परिचर्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्या पौर्णिमा नाईक, तसेच विविध विभागांचे प्रमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. बालरोग विभागाचे सीनिअर रेसिडेंट डॉ.अवंती परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. ज्युनिअर रेसिडेंट डॉ. वैदेही चौधरी यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपा जोशी, डॉ राहुल कोपीकर , डॉ नीलिमा बद्रखें, डॉ गुरमिलन गुप्ता, पदव्यूत्तर विदयार्थी डॉ.अमोल शिंगणे, डॉ. श्रेया गावडे, डॉ. पृथ्वी जोशी आदींनी परिश्रम घेतले.
चौकट
पोस्टर प्रदर्शन स्पर्धा
‘सीपीआर’चे प्रशिक्षण कसे द्यावे? हे सर्वसामान्य नागरिकांना सोप्या भाषेत व चित्रातून समजावे याकरिता पोस्टर बनवा ही स्पर्धा घेण्यात आली. तसेच सभागृहाच्या बाहेर रांगोळीद्वारे ‘सीपीआर’बाबत प्रबोधन करण्यात आले. फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. दीप्ती वाधवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टर स्पर्धेत मोठा सहभाग नोंदवला. तीन सर्वोत्तम पोस्टर्ससाठी बालरोग विभागतर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले.