ताहाराबाद येथील मविप्र संस्था संचलित, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, ताहाराबाद विद्यालयातील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी कु. योगेश नामदेव सोनवणे याने राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून मविप्र संस्थेचे तसेच ताहाराबाद विद्यालयाचे नाव उज्वल केले.
नुकतीच हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी राष्ट्रीय माउंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धेत ताहाराबाद विद्यालयातील विद्यार्थी योगेश सोनवणे याने सहभाग नोंदविला होता. त्यात सब ज्युनिअर गटात योगेशने 51 मिनिट व 41 सेकंद या विक्रमी वेळेत सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत त्याने तीन सुवर्णपदके जिंकून मविप्र संस्थेचे, विद्यालयाचे तसेच नाशिक जिल्ह्याचे नाव उज्वल केले. मागील काही महिन्यात पार पडलेल्या मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत देखील त्याने सहावा क्रमांक पटकावला होता. सदर स्पर्धेत उज्वल यश प्राप्त केल्यामुळे योगेशला आता पुढील काही दिवसात हरियाणा राज्यात पार पडणाऱ्या सायकलींग इंडिया कॅम्पमध्ये सहभाग घेता येणार आहे. त्यानंतर मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत त्याला लहान गटातून भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे. योगेश हा ग्रामीण भागातून तसेच गरीब कुटुंबातून प्रसिद्धीस आलेला युवा सायकलपटू आहे. भारतातील ग्रामीण भागातील तरुणांमध्ये किती गुणवत्ता आहे याचे उदाहरण योगेशने सगळ्यांना दिले.सर्व स्तरातून योगेशचे अभिनंदन होत आहे. मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी मविप्र संस्थेचे बागलाण तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, महिला संचालिका श्रीम. शालनताई सोनवणे तसेच ज्युनिअर कॉलेज शालेय समितीचे अध्यक्ष विलासबापू निकम,श्री.गांगूर्डे सर यांच्यासह प्रत्यक्ष ताहाराबाद विद्यालयात जाऊन योगेश सोनवणे याचा सत्कार केला. यावेळी ॲड. नितीन ठाकरे यांनी योगेशला भावी काळात सायकलिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम होण्यासाठी सहा लाखाची उत्कृष्ट सायकल विकत घेण्यासाठी जो खर्च लागेल त्याचा अर्धा खर्च मविप्र संस्था करेल असे आश्वासन देऊन योगेशला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. योगेशला सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पगारे, उपमुख्याध्यापिका आर.आर.सोनवणे, श्री.एस.आर.देशमुख,वर्गशिक्षक के.एन. भडांगे, क्रीडा शिक्षक एस. बी. देवरे, एस. एफ. मन्सूरी,अभिजीत गोसावी तसेच शिक्षकांनी सहकार्य केले.