मविप्र संस्थेच्या मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात दि.४ मे रोजी सन १९७८-७९ बॅच चा स्नेहमेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक रमेश आबा पिंगळे व दामोदर मानकर होते. यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षक के जी हांडगे,टी एम ठाकरे, टी बी उशीर,डी एम जगताप,व्ही के भामरे,यु एस मुळाने,श्रीमती कदम,श्रीमती डी एम पाटील,श्रीमती रकिबे ,शिवाजी निमसे, डॉ अशोक पिंगळे इ.उपस्थित होते. यावेळी बोलताना ॲड. नितीन ठाकरे यांनी ‘ माजी विद्यार्थी हे संस्थेचे महत्वाचे आधारस्तंभ असून त्यांच्याकडून आजच्या पिढीला मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते. संस्थेच्या वतीने माजी विद्यार्थी संघ निर्माण केला असून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी सहभागी होत आहेत. माजी विद्यार्थी हे पुन्हा नव्याने संस्थेसोबत जोडले जात असून हि आनंदाची बाब आहे. मविप्र संस्थेची वाटचाल दमदारपणे सुरु असतांना माजी विद्यार्थी संस्थेच्या भरभराटीसाठी त्यांच्या परीने आवश्यक तो हातभार लावतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वागत मनोगतात डॉ अशोक पिंगळे यांनी ‘ मखमलाबाद,मातोरी,मुंगसरा व ब्राम्हणगाव सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांच्या , कष्टकऱ्यांच्या मुलांचा सामाजिक व कौटुंबिक आलेख उंचावण्यासाठी संस्थेच्या कर्मवीरांनी, समाजधुरीणांनी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. संस्थेप्रती व जुन्या पिढीतील शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्याच्या दृष्टीने स्नेहमेळाव्याचे आयोजन केल्याचे डॉ पिंगळे यांनी सांगितले. प्रास्ताविकात बाजीराव पिंगळे यांनी ‘ जीवनाचा प्रवास सुखकर होण्यासाठी शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. बालपणीची मैत्री आजही कायम असून मखमलाबाद शैक्षणिक संकुल आज अतिशय दर्जेदार झाले असल्याने कृतज्ञ झाल्यासारखे वाटते अशा भावना व्यक्त केल्या. श्रीमती कदम यांनी आपल्या मनोगतात ‘ १७ ते १८ वर्ष मखमलाबाद शाळेत अध्यापनाचे काम करतांना माहेरसारखे प्रेम मिळाले. चांगले शिक्षक सहकारी मिळाल्याने विद्यार्थी घडविता आले. ४५ वर्षांनंतर आयोजित स्नेह मेळाव्याने अतिशय आनंद वाटला. अध्यक्षीय मनोगतात दामोदर मानकर यांनी ‘ माजी विद्यार्थी मेळाव्यांच्या आयोजनातून जुन्या व नव्याचा चांगला मेळ घातला जातो. नवीन पिढीला जुन्या व अनुभवी लोकांच्या कामातून प्रेरणा मिळते. यामुळे आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळते असे विचार त्यांनी मांडले. यावेळी ठाकरे सर, रामदास पिंगळे, दिनकर काकड व सुरेखा खेलूकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी १९७८-७९ बॅच मधील कचुनाना हांडगे,दिनकर काकड,रामदास पिंगळे, बाजीराव पिंगळे, कल्पना जाधव, अलका पिंगळे, अलका फडोळ,जीजाताई निमसे,अगस्ठी फडोळ, पोपट ताजने,बाळकृष्ण घुगे, चित्रा देशमुख, रमेश काकड, नंदा वावरे इ. उपस्थित होते.