शहराला स्कील सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे. यासंदर्भात मविप्र संस्थेच्या गंगापूर रोडवरील राजर्षी शाहु महाराज तंत्रनिकेतन येथे बैठक पार पडली. या वेळी उपस्थित तज्ज्ञांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत शहरातील कौशल्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच संस्थांना समाविष्ट करून त्यांच्या कामाचे स्वरूप समजून घेण्यात आले. तसेच या कामाच्या विस्तारासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली.
क्वालिटी सिटीचे अध्यक्ष जितुभाई ठक्कर, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, उद्योजक हेमंत राठी, एनएसडीसीचे रवी वर्मा, महम्मद कलाम उपस्थित होते. जितूभाई ठक्कर यांनी स्कील सिटीची संकल्पना समजून सांगितली. त्यानंतर एनएसडीसी संपूर्ण भारतात कौशल्य विकासाच्या कोणकोणत्या योजना राबवत आहे, याविषयी रवी वर्मा व त्यांच्या टीमने माहिती दिली.
हेमंत राठी यांनी नाशिकमधील शैक्षणिक संस्था व झोपडपट्टी परिसर तसेच नाशिकच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये कौशल्य विकासाच्या प्रकल्पाबाबत स्किल सिटीची भूमिका विशद केली. प्राचार्य प्रशांत पाटील यांनी कौशल्य विकास क्षेत्रात गती आणण्यासाठी सादर केलेल्या प्रकल्पांना एनएसडीसीने मंजुरी देण्याची मागणी केली. संपूर्ण भारतात नवीन पथदर्शी प्रकल्प तयार होण्याच्या दृष्टीने चालना द्यावी याविषयी अवगत केले. के. के. वाघ संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सह्याद्री फार्मचे प्रमोद पाटील, अरविंद महापात्रा, निशिकांत अहिरे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील, संजय जोशी, संदीप कुटे, सचिन पाचोरकर, बॉश एटीएस लॅबच्या तेजस्विनी पावस्कर, नीलेश खालकर, एनएसडीसीचे अर्पित अस्थाना, आरोशी मलिक यांनीही कौशल्य विकास क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले.
क्वालिटी सिटीच्या स्कील सिटी प्रकल्पांतर्गत नाशिक शहर व आजूबाजूचे खेडे यांच्यात कौशल्य विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम होईल असा आशावाद मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला. श्री. ठक्कर म्हणाले, की क्वालिटी सिटी प्रकल्पाच्या स्किल सिटी प्रकल्पाने गती घेतली आहे. सर्वच कौशल्य विकास क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या एकत्रित प्रयत्नातून या दिशेने महत्त्वपूर्ण काम होईल. त्या संदर्भात योग्य ते नियोजन करण्यात येईल.