११ व्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाची सुरुवात दिनांक ४ मार्च रोजी सह्याद्री फार्म मोहाडी येथे झाली. याप्रसंगी मविप्र संस्था निर्मित मविप्र पत्रिकेच्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष साहित्यिक भानू काळे, जेष्ठ शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील,सह्याद्री फार्म चे चेअरमन विलास शिंदे,मा.आ.सरोजताई काशीकर,ॲड.वामनराव चटप,गंगाधर मुटे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे ,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती डी बी मोगल,संचालक प्रविण जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे,डॉ आय बी चव्हाण ई.उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी ‘ मविप्र हि महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था असून संस्थेचे सभासद हे मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील व शेतकरी आहेत. शेतकरी जीवन हे खडतर असून शेतीसमोरील समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचे मार्ग शोधावे लागतील.कच्या मालाचे रुपांतर पक्क्या स्वरूपात करून शेतीमध्ये सुधारणा करता येईल. शेतकऱ्यांमध्ये मोठी क्षमता असून मविप्र कृषी विशेषांक हा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मविप्र संस्थेच्या माध्यमातून दर शनिवार उदाजी मराठा बोर्डिंग येथे शेतकऱ्यांना भाजीपाला व कृषी विक्री साठी उपलब्ध करून दिला आहे. मविप्र संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण व ज्ञानदानासोबतच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. मविप्र कृषी विशेषांकाचे अतिथी संपादकाची जबाबदारी हि सह्याद्री फार्म चे चेअरमन विलास शिंदे यांनी सांभाळली असून या अंकात कृषी क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा तसेच कृषी क्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन केलेले आहे.