मराठा विद्या प्रसारक समाजाच्या राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन, विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एक नविन प्रकल्प साकारला आहे. निरोगी माणसाची दैनंदिन जीवनाची सुरुवात ही पुरेसा व्यायाम करून होते, मग या गोष्टीचा जर छोट्याश्या का होईना वीज निर्मिती साठी उपयोग झाला तर ? हाच विचार मनात ठेऊन विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी एक प्रकल्प साकारला आहे. त्यात त्यांनी एका छोट्याश्या सायकलच्या मदतीने वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी देखील झाला आहे. या निर्माण झालेल्या विजेचा उपयोग मोबाईल चार्जिंग, रोषणाई किंवा बॅटरी मध्ये स्टोअर देखील करता येऊ शकते.
सायकलिंग ही एक अत्यंत लवचिक कसरत आहे जी घराबाहेर आणि घरामध्ये दोन्ही ठिकाणी केली जाऊ शकते. ती सर्व वयोगटातील आणि सर्व फिटनेस पातळ्यांसाठी योग्य आहे. सायकलिंगचा वापर करून वीज निर्मिती देखील करता येऊ शकते याचा यशस्वी वस्तुपाठ राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे.
मानवी शारीरिक प्रयत्नांचा वापरण्यायोग्य विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित करणे हा प्रकल्पाचा उद्देश होता. व्यायामासाठी वापरल्या जाणाऱ्या व्यायामशाळेतील सायकल, तसेच इतर साधने यांचा उपयोग वीजनिर्मिती साठी होऊ शकतो सायकल चालवण्याने निर्माण होणाऱ्या यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. ही उर्जा नंतर विविध कारणांसाठी वापरली जाऊ शकते, संभाव्यता: पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करता येणे यापुढे शक्य होणार आहे.
या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वास मोरे,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल, संचालक मंडळ, महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी.लोखंडे यांनी अभिनंदन केले.