निसर्गाचा ढासळणारा समतोल आणि जागतिक तापमानवाढ यामुळे संपूर्ण मानवजातीसह पशुपक्षी आणि जलचर प्राण्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या सर्वांचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही अंधकारमय आहे. यावर एकच आशेचा किरण म्हणजे प्रत्येकाने वृक्ष संवर्धन करत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..’ ही संतांची उक्ती आचरणात आणावी, असे प्रतिपादन ‘मविप्र’ समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.
निफाड येथील कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालयात आयोजित ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. सुरेश जाधव यांनी प्रास्तविकातून या उपक्रमाचा हेतू व महत्त्व स्पष्ट केले. यावेळी वन्यजीव छायाचित्रकार सुमित अहिरे यांनी अथक प्रयत्नातून तयार केलेली ‘डॉक्युमेंटरी’ पाहून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. डॉ. उत्तमराव डेर्ले व डॉ. सीमा डेर्ले यांनीदेखील विचार मांडले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन झाले. निफाड ते पंढरपूर अशी सायकलवारी करून आरोग्य व निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे निफाड सायकलिस्ट प्रवीण तनपुरे, ऍड. रामनाथ शिंदे, पांडुरंग कडवे, प्रियंका मोरे, निलेश गवळी, संदीप गवळी, संदीप भाबड, मनीषा वाघ, विक्रम डेर्ले, विनोद बनकर यांचा सभापती क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. महेश एच. बनकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन केले. पी. सी. खापरे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी डॉ. सुसान लोरेन्सिया, डॉ. प्रवीण ढेपले, प्रा. योगेश कडलग, डॉ. सुरेखा जाधव, डॉ. सुनिता उफाडे, प्रा. गोकुळ सानप, रुपाली मोहोड, प्रा. महेंद्र पवार, प्रा. चंद्रशेखर मोरे, डॉ. बी. सी. आहेर, वैशाली गीते, सर्व प्राध्यापक व सेवकवृंद यांनी परिश्रम घेतले.