मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाजाने शुभेच्छांचा औपचारिक कार्यक्रम न ठेवता पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविला. नाशिक जिल्ह्यातील संस्थेच्या सर्व ५१२ शाखांमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी, कर्मचारी आणि पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागातून २,२०० देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रत्येक रोपाचे संगोपन, संवर्धन आणि विद्यार्थ्यांकडून ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ या भावनेतून त्यांची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला.
वड, पिंपळ, कडूनिंब, जांभूळ, करंज, बहावा, चिंच, आवळा यांसारख्या पर्यावरणपूरक आणि दीर्घायुषी वृक्षांची लागवड करून हरित भविष्याचा मजबूत पाया रचण्यात आला. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मविप्र संस्थेने या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविताना भावी पिढीमध्ये निसर्गप्रेम, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. आज लावलेले हे २,२०० वृक्ष केवळ रोपे नाहीत, तर उद्याच्या शुद्ध श्वासाची, समृद्ध पर्यावरणाची आणि हरित महाराष्ट्राची आश्वासक बीजे आहेत.
.
.
.


